‘सायकल चालवा’ हा संदेश देण्यासाठी रविवारी हजारो सायकलस्वार उद्योगनगरीत जनजागृती करणार 

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन

वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून प्रदुषणावर उपाय म्हणून नागरिकांनी इंधनावरील वाहनांचा वापर कमी करुन सायकलाचा जास्तीत-जास्त वापर करावा यासाठी येत्या रविवारी (दि.4) ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो सायकलस्वार सहभागी होऊन उद्योगनगरीत सायकल चालवा हा संदेश देणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत यांनी दिली.

सायकलिंगसाठी 5, 15 आणि 30 किलोमीटर असे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या उपक्रमाची रविवारी सकाळी सात वाजता निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 27 येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून सुरुवात  होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ‘झेंडा’ दाखवून सायकलिंगच्या जनजागृतीला सुरुवात होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे उपस्थित असणार आहेत.

”जवळचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. तसेच सायकलिंग केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. चांगल्या वातावरणासाठी, सदृढ आरोग्यासाठी आणि निखळ आनंदासाठी सायकल चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही शहरवासियांना सायकल चालविण्याचे ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत”, असे बिमल रावत यांनी सांगितले.

30 किलोमीटरसाठी निगडी भेळ चौक-बिग इंडिया चौक-हुतात्मा चौक, भोंडवे कॉर्नर-रावेत पूल, डांगे चौक- जगताप डेअरी चौक, कोकणे चौक, नाशिक फाटा पूल-भोसरी लांडेवाडी चौक, केएसबी चौक-थरमॅक्स चौक-यमुनानगर, भक्ती-शक्ती चौक-भेळ चौक असा असणार आहे. 15 किलोमीटरसाठी याच मार्गे डांगे चौकमधून चिंचवडगाव मार्गे आकुर्डी ते प्राधिकण असा असणार आहेत. तर, 5 किलोमीटरसाठी प्राधिकरणातील मार्ग निश्चित केला आहे.

कार्यक्रमाची सांगता निगडी येथे होणार आहे. समारोपावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड व पुणे शहरामधील सायकलिंग, पर्यावरण, गिर्यारोहण, समाजकार्य या क्षेत्रामधील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या उपक्रमानिमित्त मिळणा-या निधीचा वापर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खरपुड व खोपेवाडी या दुर्गम भागातील दोन छोट्या गावांमध्ये आंनदी ग्राम या नावाने सुरु असणा-या विकास कामांसाठी करणार आहेत. आजपर्यंत रोटरीने या गावांमध्ये जलसंधारण, किफायतशीरदार शेती, फायदेशीर पशुपालन, आरोग्य शिक्षण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले आहे.

या उपक्रमाच्या संयोजनात रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत, आनंदी ग्राम प्रकल्प प्रमुख धनंजय भिंगे, नितीन ढमाले, ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे प्रमुख विजयकुमार नाईक, संदीप डांगे, सदानंद नायक, अतुल भोंडवे, संतोष गिरंजे, मेहुल परमार तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.