सिंधूला नमवत सायनाने पटकावले सुवर्ण पदक

गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूला नमवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट जिंकून सायनाने बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताच्या या अत्यंत प्रसिद्ध आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या दोन्ही खेळाडू महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये आमने सामने आल्याने सामन्याचे महत्त्व वाढले होते. अंतिम लढतीमध्ये सायनाने २१-१८ आणि २३-२१ अशा गेममध्ये सिंधूचा पराभव केला आणि सुवर्ण पदक पटकावले.

दरम्यान, या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, तरी भारताला पारड्यात रौप्य पदकही मिळाले आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे आता भारताच्या पारड्यात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदके पडली आहेत.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आतापर्यंत 26 सुवर्ण, 20 रौप्य व 20 कांस्य पदकांची कमाई केली. एकूण 66 पदकासह भारत पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.