सुरक्षित प्रसुतीसाठी शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खासगी विशेषज्ञांची नेमणूक

● 25 जिल्हे
● 101 आरोग्य संस्था
● 128 खासगी स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ञांची नेमणूक
● दोन महिन्यात सुमारे 1200 सिझेरियन शस्त्रक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
ग्रामीण भागात विशेषज्ञांअभावी प्रसुती दरम्यान होणारे माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यातील 101 आरोग्य संस्थांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ व ऑन कॉल यापद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ञांचा समावेश आहे. दोन महिन्यात सुमारे बाराशेपेक्षा अधिक सिझेरियन या खासगी विशेषज्ञांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. माता व बालमृत्यू दर रोखण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच हा एक महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत घेण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील हजारो गर्भवती महिलांना व नवजात शिशूंना होत आहे.

ग्रामीण भागात नियुक्ती देऊन देखील डॉक्टर्स कामावर हजर न होण्याचे प्रमाण जास्त आहे. शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात विशेषज्ञांची उपलब्धता नसल्याने सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देतांना अडचणी येतात. बऱ्याचदा काही आरोग्य केंद्रांमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर रुग्ण तपासणी आणि त्या अनुषंगाने ताण येतो. तर काही ठिकाणी विशेषज्ञच उपलब्ध होत नाही, या सर्व बाबींचा विचार करून खासगी विशेषज्ञांची सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरीक्त मोबदला देण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतल्याने खासगी डॉक्टर आपली सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देतील.

तीन पद्धतीने सेवा घेतली जात असून त्यात कंत्राटीपद्धतीमध्ये मोबदला अधिक कामानुसार अतिरीक्त मोबदला, अर्धवेळ काम करून बाह्यरुग्ण तपासणी आणि ऑन कॉल अशा पद्धतीने खासगी विशेषज्ञ सेवा देतील. राज्यात सध्या 101 ठिकाणी नव्याने नियुक्त विशेषज्ञांमध्ये स्त्रीरोग तज्ञ 116 असून त्यात कायमस्वरूपी 64 आणि कंत्राटीपद्धती वरील 52 विशेषज्ञांचा समावेश आहे. भूलतज्ञांची संख्या 75 असून त्यात कायमस्वरुपी 30 आणि कंत्राटीपद्धतीवरील 45 डॉक्टरांचा समावेश असून बालरोग तज्ञांमध्ये कायमस्वरूपी 61 आणि कंत्राटीपद्धतीवरील 30 असे एकुण 91 विशेषज्ञांची संख्या आहे. एकुण 282 विशेषज्ञांमध्ये 128 खासगी विशेषज्ञ आहेत.

प्रसुतीचे नॉर्मल, असीस्टेड आणि सिझेरियन असे तीन स्तर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आहेत. जेथे सिझेरियन प्रसुतीसाठीची सोय आणि विशेषज्ञ आहेत असे आरोग्य केंद्र स्तर 3 मध्ये येते. अशा केंद्राच्या ठिकाणी जास्त करून हे विशेषज्ञ नेमण्यात आले आहेत.  दोन महिन्यांपासून हि प्रक्रिया सुरू आहे. साधारणता पाच लाख लोकसंख्येसाठी स्तर 3 चे सुविधा असलेले केंद्र मंजूर केले जाते. राज्यात अशी एकुण 245 ठिकाणे अंतिम करण्यात आली असून त्याठिकाणी टप्प्याटप्प्याने सिझेरियनची सोय केली जात आहे. यापैकी 180 ठिकाणी ही सुविधा सुरू झाली आहे.

मातामृत्यू रोखण्यासाठी खासगी विशेषज्ञांच्या सेवा घेण्याचा निर्णय : आरोग्यमंत्री

केंद्र शासनाच्या एसआरएस सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राचा अर्भक व बालमृत्यू दर दोन अंकानी घटला आहे. प्रसुती दरम्यान होणारा माता मृत्यू दर  68 (एक लाख जन्मामागे) आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाने नियमीत सेवेतील डॉक्टरांबरोबरच खासगी विशेषज्ञांच्या सेवा घेऊन महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खासगी विशेषज्ञांच्या सेवेमुळे राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे शक्य होणार आहेत. सामान्य आणि गरिबांना खासगी रुग्णालयात सिझेरिअन शस्त्रक्रिया करणे खर्चिक बाब ठरते. त्यामुळे शासकीय संस्थेत ही सुविधा उपलब्ध झाल्यास ती मोफत केली जाते. राज्यात दरवर्षी अंदाजे 10 लाख प्रसुती ह्या शासकीय संस्थांमध्ये होतात. त्यातील अंदाजे 10 टक्के प्रसुती सिझेरीयन करून केल्या जातात. म्हणजे राज्यभरात दिवसाला सरासरी 200 ते 250 सिझेरिअन प्रसुती केल्या जातात. अशावेळी गुंतागुंतीच्या केसेसमध्ये वेळेवर विशेषज्ञ उपलब्ध न झाल्यास माता व अर्भकाच्या जिवीताचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे खासगी विशेषज्ञांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, लातूर, वर्धा, गडचिरोली, सिंधुदूर्ग, रायगड, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, परभणी, अमरावती, हिंगोली, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण तसेच महिला रुग्णालयात या विशेषज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.