हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलीप भरणे आणि सुनील भरणे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी परिसरात ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दिलीप नामदेव भरणे आणि सुनील नामदेव भरणे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अद्याप संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दिलीप नामदेव भरणे आणि सुनील नामदेव भरणे (रा.भरणेवस्ती माणगाव ता.मुळशी जि.पुणे) हे दोघेजण वाढदिवसानिमित्त मंगळवारी मध्यरात्री फटाके वाजवत होते. त्याची ठिणगी शेजारी असणाऱ्या मंडपावर पडली आणि काही मंडप जळाला. याचाच जाब विचारण्यासाठी ४५ वर्षीय फिर्यादी महिला आणि त्यांचे नातेवाईक गेले असता संशयित आरोपींनी फिर्यादी महिलेच्या हाताला धरत मारहाण करुन शिवीगाळ केली. यामुळे संबंधित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिलीप भरणे हा माण परिसरातील प्रसिद्ध पैलवान आहे. तर सुनील भरणे हा माण ग्रामपंचायतीचा सदस्य आहे.