पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून १ कोटी ८० लाख रुपयांची वाहतूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या रॅलीसाठी मतदारांना जमविण्यासाठी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडु यांच्या ताफ्त्यातून मंगळवारी रात्री १ कोटी ८० लाखांची वाहतूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सकाळी अरुणाचल प्रदेशात प्रचाराची रॅली होती. त्याअगोदर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री पेमा खांडु यांच्या मोटारीच्या ताफ्त्यात असलेल्या एका मोटारीत १ कोटी ८० लाख रुपये सापडले. याबाबत आज सकाळी काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आढळून आलेली १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठीच ती मतदारांना वाटण्यासाठी पाठविली जात असल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वीही अरुणाचल प्रदेशातून आयकर विभागाने लोकसभा निवडणुकीत वापरली जाण्याची शक्यता असल्याच्या संशयावरुन कोट्यावधी रुपये जप्त केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आतापर्यंत देशभरात अवैध दारु आणि अमली पदार्थ असे सर्व मिळून १ हजार ४६० कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी एकट्या गुजरातमध्ये ५०९ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे.