विद्यमान आमदाराला मदत करणं ‘भोवलं’, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस तडकाफडकी ‘निलंबीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ठाणे जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदमला जेलमधून बाहेर काढल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

दोन दिवसांपूर्वी कासरवडवली येथील वाघबीळ नजीकच्या पुष्पांजली सोसायटीतील एका घरातून सुमारे 53 लाख 46 हजार रुपायंची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी रमेश कदम देखील आढळून आला होता. रमेश कदमला जेलमधून बाहेर काढून खासगी सोसायटीत घेऊन गेल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

रमेश कदमला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले होते. मात्र तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले होते. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेला रमेश कदम यंदा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे.