‘या’ बँकेत पडला तब्बल १ कोटींचा दरोडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पान्हाळा तालुक्यातील कळे गावातल्या यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला असून तब्बल एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश हा ऐवज लंपास केला आहे.

चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. दररोजच दुकाने फोडल्याचे, तर कुठे मंदिरातील दानपेटी आणि मंदिरातील दागिने चोरी झाल्याचे वृत्त येत असते, इतकेच नव्हे तर, बँकेवर दरोडा, पोलिसांच्याच घरी चोरी अश्याही घटना समोर येत असतात. याचदरम्यान पान्हाळा तालुक्यातील कळे गावात बाजार भोगाव मार्गावरील मुख्य बाजारपेठेत यशवंत सहकारी बँकेची शाखा आहे.

दरम्यान चोरट्यांनी गुरुवारी रात्री बँकेच्या इमारतीच्या उजव्या बाजूच्या खिडकीचे ग्रील गॅस कटरच्या साहाय्याने तोडून बँकेत प्रवेश केला. इतकेच नव्हे तर, बँकेत प्रवेश करताच त्यांनी सी.सी.टी.व्ही. आणि संगणकीय यंत्रणेची वायर कापून ते बंद केले. त्यानंतर त्यांनी लॉकरच्या सभोवतीची असलेली जाळी कापून बँकेच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्यांची कलमे ताब्यात घेतली. त्यानंतर तिजोरीचे लॉक कापून त्यातील ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. सगळा मिळून तब्बल एक कोटींचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.

याघटनेची माहिती कळताच कळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याचबरोबर घटने संदर्भात पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून. ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.