1 जानेवारीपासून ‘या’ 11 महत्वांच्या गोष्टीमध्ये होणार बदल, जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फास्टॅग, जीएसटी, गॅस सिलेंडर, विमा, चेक पेमेंट, कॉलिंग, व्हॉट्सॲप, वाहनांच्या किंमती या संदर्भातील नियमावलींसह नवीन वर्षात अनेक नवे नियम लागू होणार आहेत. यातील काही नियम हे नागरिकांच्या हिताचे आहे. परंतु काही गोष्टी महाग होणार आहेत. नव्या वर्षात लागू होणाऱ्या महत्त्वपू्र्ण नियमावलीवर एक नजर मारूयात.

1) चेक पेमेंटच्या पद्धतीत बदल – पॉझिटीव्ह पे सिस्टीम एक स्वयंचलित टूल आहे. चेकच्या माध्यमातून फसवणुकीला लगाम लावण्यासाठी या सिस्टीमचा फायदा होणार आहे. या सिस्टीममध्ये चेक देणाऱ्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख, लाभार्थीचं नाव, प्राप्तकर्ता आणि पेमेंटची रक्कम याची माहिती पुन्हा द्यावी लागेल. चेक देणारी व्यक्ती एसएमएस, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या माध्यमातून याची फेर पडताळणी करू शकतो. बँका 50000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या धनादेशाला हा नियम लागू करणार आहेत.

2) सिलेंडरच्या किंमतीत होणार बदल – तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किंमती ठरवत असतात. त्यामुळं आता यातही 1 जानेवारीला बदल पहायला मिळेल. ग्राहकांना डिसेंबरमध्ये 2 वेळा वाढलेल्या किंमतीतून दिलासा मिळणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

3) नव्या वर्षात 1 जानेवारी पासून अल्प हप्त्यावरही मिळणार विमा पॉलिसी – नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कमी हप्त्यात सरळ जीवन विमा (स्टँडर्ड टर्म प्लॅन) पॉलिसी खरेदी करणं शक्य होणार आहे. विमा कंपन्यांनी आरोग्य संजीवनी नावानं स्टँडर्ड रेग्युलर हेल्थ इंश्योरंस प्लॅन सुरू केल्यानंतर भारतीय विमा प्राधिकरणानं (आयआरडीए) एक साधारण पॉलिसी सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 1 जानेवारी पासून सरळ जीवन विमा पॉलिसी सूरू होणार आहे.

4) GST रिटर्न भरण्याच्या पद्धती बदलणार – वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सकारनं बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपासून छोट्या करदात्यांना तिमाही रिटर्न भरता येईल. तसंच कर मासिक स्वरूपात भरणं शक्य होणार आहे. 5 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या ज्या व्यावसायिकांनी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत रिटर्न भरला आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

5) फास्टॅग अनिवार्य –1 जानेवारी 2020 पासून चारचाकी वाहनांना फास्टॅग (FASTag) बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं याची माहिती दिली आहे.

6) कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा वाढणार – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नं एटीएम कार्ड आणि युपीएच्या माध्यमातून व्यवहार करण्याच्या नियमावलीत बदल केला आहे. आरबीआय युपीएच्या माध्यमातून कॉन्टॅक्टलेस व्यवहाराची मर्यादा 2000 रुपयांवरून 5000 रुपये एवढी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

7) लँड लाईनवरून मोबाईल कॉल करताना 0 वापरणं अनिवार्य – लँड लाईनवरून कॉल करताना देशभरात 0 नंबरचा वापर अनिवार्य असणार आहे. दूरसंचार विभागानं ट्रायचा प्रस्ताव मान्य केला आहे. नव्या वर्षात हा निमय लागू होणार आहे. यामुळं टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्यास मदत मिळेल.

8) या मोबाईलमधील व्हॅट्स ॲप होणार बंद – नव्या वर्षात अँड्रॉईड 4.3 आणि आयओएस 9 या जुन्या ऑपरेटींग सिस्टीमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप वापरता येणार नाही.

9) वाहनांच्या किंमती वाढणार – नव्या वर्षात वाहन खरेदी करणं महाग ठरणार आहे. स्टील ॲल्युमिनिअम आणि प्लास्टिकच्या कंपन्यांनी उत्पादन दर वाढवल्यामुळं चार चाकी वाहन निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहेत.

10) पीएफ (PF) वरील व्याज – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्यात येणार आहे. नव्या वर्षात भविष्य निधी खातेदारांना याचा लाभ मिळेल.

11) टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार – नव्या वर्षात एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अन्य होम अप्लायंसेसच्या किंमती 10 टक्के वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं प्लास्टिक महागलं आहे. याचा होम अप्लायंसेसच्या किमतीवर परिणाम होणार आहे.