भरधाव कंटेनरची कारला धडक; 1 ठार, चार जखमी, पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

करकुंभ : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव कंटेनरने(Container) कारला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला, तर चौघे किरकोळ जखमी झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. 28) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर कंटेनर(Container)चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

संजयकुमार पोपटलाल शहा (वय 60, रा. नवोद्यनगर, सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे, तर स्रमाट संजयकुमार शहा, अथर्व स्रमाट शहा, दिया स्रमाट शहा, कोमश शहा अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी कोमल शहा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा कुटुंबीय कारमधून सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कुरकुंभ येथील गिरमेवस्तीजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या (एमएच 04 जीआर 4857) कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील संजयकुमार शहा यांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती हिरवे, राकेश फाळके, दत्तात्रेय चांदणे, अमोल राऊत तपास करत आहेत.

You might also like