1 मार्चपासून खासगी रुग्णालयातही दिला जाईल ‘कोरोना’ लसीचा डोस, ‘या’ असतील अटी; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गेल्या वर्षभरापासून भारतात कोरोना साथीने कहर माजवला होता. आता या साथीला सामोरे जाण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करला लसीचा डोस दिल्यानंतर आता 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना हा डोस देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आता खासगी रुग्णालयात देखील कोरोना लसचा डोस दिला जाऊ शकतो. खासगी रुग्णालयांमध्ये लस केवळ अशा लोकांना दिली जाईल जे सरकारी नियमांनुसार लस घेण्यास पात्र आहेत.

दुसर्‍या टप्प्यात, सरकारने लस डोस घेणाऱ्यांच्या वयोगटात फेरबदल केला आहे. आता 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जाईल. पूर्वी ती 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीचे डोस देण्यात येतील, ज्यांना आधीच गंभीर आजाराने ग्रासले आहे. अशा लोकांना त्यांच्या त्रासासंबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील.

खासगी रुग्णालयात द्यावी लागेल लसीची किंमत

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकारने 20 हजार रुग्णालयाला चिन्हांकित केले आहे. येथे लसी घेणाऱ्यांना त्या लसीचा खर्च द्यावा लागेल. त्याचबरोबर केंद्र सरकारने तयार केलेल्या लसी केंद्रांवर कोरोना लस विनामूल्य दिली जाईल. केंद्र सरकार येत्या काही दिवसांत खासगी रुग्णालयांमध्ये लसीचे दर निश्चित करेल.

लस निवडण्याचा पर्याय सध्या अस्पष्ट

केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच को-विन अ‍ॅपमध्ये डेटा फीड दिला जाईल. देशात 60 वर्षांपेक्षा जास्त लोकांची लोकसंख्या 45-50+ वयोगटातील लोकांपेक्षा कमी आहे. रुग्णालयात दिली जाणारी लस एकतर कोवॅक्सीन किंवा कोविशिल्ड असेल. दरम्यान , कोरोना लस घेणाऱ्यांना दोनपैकी एक लस निवडण्याचा पर्याय दिला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, बुधवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले की 1 मार्चपासून वृद्धांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाईल. पहिल्या टप्प्यात, फ्रंटलाइन वर्कर्सला कोरोना लस दिली जात आहे. दुसर्‍या टप्प्यात वृद्धांना लस डोस देण्यात येणार आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कोरोना लसीची किंमत दिल्यानंतरच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना ही लस घ्यावी.