महिला कंडक्टरचा विनयभंग करणाऱ्या लेखनिकला (Accountant) १ वर्षाचा कारावास 

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर येथिल एस. टी. डेपोमध्ये महिला कंडक्टर कामावर कार्यरत असताना कार्यालयीन लेखनिक (अकाऊटंट) महादेव यशवंत शेलार रा. भिगवण.यांनी तीचा हात धरून विनयभंग केल्या प्रकरणी इंदापूर येथिल प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती.एस.बी. यादव यांचे न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम ३५४ नुसार एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दीवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली, तर भा.द.वि.कलम ५०६ नुसार ६ महिने सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवस साधा कारावास अशी शिक्षा दिनांक ११ डिसेंबर  २०१८ रोजी खटला निकाली काढताना सुनावली आहे.

याबाबतची सविस्तर हकिकत अशी की, फिर्यादी महिला कंडक्टर या दिनांक १० एप्रिल २०१२ रोजी एसटी डेपो इंदापूर येथे कार्यरत असताना तीला तीचा टेबलवर ठेवलेला मोबाईल सापडत नाही म्हणून तीने लेखाकार (अकाऊटंट) महादेव शेलार यांना मोबाईल बाबत विचारणा केली असता शेलार याने मोबाईल माझ्याकडे आहे. तु टेबलाजवळ येवुन घेवुन जा असे सांगीतले. ज्या वेळी ती मोबाईल घेण्यासाठी त्याचेकडे गेली, त्यावेळी शेलार याने फिर्यादीचा हात धरून ओढला. त्यावेळी फिर्यादीने तीचा हात झटकुन मागे घेतला व शेलार यास त्याबाबत विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असे म्हणाला. अशा प्रकारची फिर्याद महीला कंडक्टर हिने दिनांक १२ एप्रिल २०१२ रोजी इंदापूर पोलीस स्टेशनला दीली होती. त्यानुसार आरोपी विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम ३५४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंद करून या घटनेचा तपास पोलिस हवालदार सुरेश मारूती नलावडे यांचेकडे देण्यात आला होता.

तपास अधिकारी पो. ह.सुरेश नलावडे यांनी या घटनेचा पुर्ण तपास करून आरोपीविरुद्ध इंदापूर येथिल प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह एकुण सात साक्षिदार तपासण्यात आले.यामध्ये फिर्यादी तसेच तपास अधिकारी सुरेश नलावडे,रविंद्र मोरे,बाळासाहेब फाळके यांनी सरकार पक्षास पुरक अशी साक्ष दीली.तर संजय कांबळे,कांतीलाल भोंग,सुरेखा कुचेकर हे साक्षिदार फितुर झाले.

आरोपीचे वकील अॅड.एन.जी. शहा यांनी आरोपीच्या बाजुने सादर केललेे पुरावे व फितुर झालेल्या साक्षिदारांची साक्ष पुरावे आरोपी निर्दोष सुटण्यासाठी पुरेसे नसल्याने ते फेटाळुन लावत इंदापूर येथिल प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी श्रीमती एस. बी. यादव यांनी सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकील अॅड. श्रीमती एस. आर. पाटील यांचा युक्तीवाद  ग्राह्य धरून फिर्यादीच्या बाजुने दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजी निकाल देताना आरोपीला  भा.द.वि.कलम ३५४ व ५०६ अन्वये वरीलप्रमाणे एक वर्ष सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा सुणावली.या महत्वपूर्ण खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.श्रीमती एस. आर. पाटील यांनी काम पाहीले व आरोपीच्या वतीने अॅड. एन.जी. शहा यांनी काम पाहीले तर कोर्ट कर्मचारी म्हणून पोलीस नाईक अशोक झगडे यांनी काम पाहीले.