Corona Lockdown : ‘कोराना’मुळे आता सरकारी कार्यालयांत कर्मचार्‍यांची 10 % उपस्थिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे सरकारने नवी अधिसूचना जारी के ली आहे. काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका क्षेत्राबाहेरील औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउननंतर 20 एप्रिलनंतर शिथिलता आणण्याबाबत राज्य सरकारने नवीन अधिसूचना काढली आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू फिरण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा सामना करणे हे मूळ उद्दिष्ट अबाधित ठेवत बाधित क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली खपवून घेतली जाणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सरकारी कार्यालयातील 10 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा ठेवण्यात आली आहे.