‘त्या’ कारमध्ये आढळली १० लाख ८० हजारांची रोकड

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशभरात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर येथे आंतर जिल्हा नाकाबंदी दरम्यान एका कारमध्ये १० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.

निवडणुक काळात मतदारांना आमिष दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण घेवाण होते. त्यासाठी निवडणूक आयोगाने आंतर राज्याच्या नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशाच वाहन तपासणीदरम्यान,  यवतमाळच्या शिरपूर येथे एका कारमध्ये दहा लाखांहून जास्त रक्कम रोकड स्वरूपात जप्त करण्यात आली आहे. वणी तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ वाहनांची तपासणी सुरू केली असता एका कारमध्ये १० लाख ८० हजार रुपये आढळले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावळे यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. इतकी मोठी रक्कम नेमकी कोणाला आणि ती कशासाठी, कोणासाठी नेली जात आहे याबाबतच्या तपासाला आता वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये कार चालकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.

तसेच त्याबाबत प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून आलेल्या दोन कारमधून रामटेक येथे ८० लाख रुपयांची रोकड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडली होती.