कोरोना अन् विषबाधेमुळे 10 माओवाद्यांचा मृत्यू; पोलिसांचा दावा

गडचिरोलीः पोलीसनामा ऑनलाइन – हिंसक माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दंडकारण्यात कोरोना आणि अन्नातून विषबाधा झाल्याने 10 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा दंतेवाडा पोलिसांनी केला आहे. दंडकारण्यात बस्तरसह तेलंगाणा, ओरोसा, आंध्रप्रदेशसह गडचिरोली जिल्ह्याचा भाग येतो.

कोरोना अन् अन्नातून विषबाधा झाल्याने 10 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बिजानुरच्या पोलीस अधीक्षकांनी केला आहे. माओवाद्यांचा वावर हा घनदाट जंगलात अतिदुर्गम भागात असतो. या भागात अनेक आदिवासी बहुल गावे आहेत, जिथे माओवाद्याची ये-जा सुरू असते. त्यामुळे माओवाद्यांकडून स्थानिक आदिवासीमध्ये कोरोनाचा धोका पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. माओवाद्यांमध्ये पसरलेल्या कोरोनाची गंभीरता लक्षात घेतल्यास 100 च्या जवळपास माओवादी आजारी असल्याचे सूत्रांनी दंतेवाडा अन् तेलंगणाच्या कोत्तागुडम पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. माओवाद्यांचे अनेक मोठे नेते गंभीर आजारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी कोरोनाची किंवा अन्य आजाराची लागण झालेल्या माओवाद्यांनी आत्मसर्पण करुन मुळ प्रवाहात यावे, पोलीस त्याच्यावर उपचार करतील असे म्हटले आहे.