Coronavirus Lockdown : क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या 10 परदेशी तबलिगींना मुंबईत अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली येथील मरकजमधून मुंबईत परतलेल्या 10 तबलिगीना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. तबलिगी जमाताच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढला हे देशातील नागरिकांना माहितीच आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप झाले. आता या प्रकरणातील 10 परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाबाधित 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1282 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.