१० हजाराची लाच घेणारा पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून १० हजार रूपयाची लाच घेणारा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील चिखली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात आडकला आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळामध्ये खळबळ उडली आहे.

दिलीप खंदारे असे लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मोबाईल चोरीचा (जबरी चोरी) गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस कर्मचारी दिलीप खंडारे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पोलिस कर्मचारी खंडारे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर सरकारी पंचासमक्ष दिलीप खंदारे यांनी तक्रारदाराकडून १० हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर खंदारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधिक्षक दिलीप बोरस्ते आणि पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.