पोलीस असल्याची बतावणी करून बलात्कारप्रकरणी १० वर्षे सक्तमजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस असल्याची बतावणी करून गळ्यातून पडलेली सोनसाखळी मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्त मजूरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

श्रीकांत लक्ष्मण डोईफोडे (वय. २७, रा. बीड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकऱणी २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. हा प्रकार १४ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला होतो.

श्रीकांत डोईफोडे याने पिडीतेला आपण क्राइम ब्रांचमधील अधिकारी असल्याची बतावणी केली. पिडीत महिलेची सोनसाखळी पडली होती. ती शोधून देण्याचे अमिष दाखवत तिला लॉजवर घेऊन गेला. त्यावेळी तिला बिअर पाजून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील सुरेश गवळी यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यात डॉक्टर व पिडीत महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. हेड कॉन्सटेबल संजय जाधव आणि कॉन्सटेबल सुमित जगझाप यांनी न्यायालयीन कामात मदत केली.