100 कोटी वसुलीचा आरोप प्रकरण : CBI चौकशीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले – ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरूवात केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यामुळे देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. सीबीआय देशमुख यांची चौकशी करीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीत मात्र सर्व आरोप फेटाळून लावले असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यांना सीबीआयच्या अधिकार्‍यांनी काही प्रश्न केले. त्यावर देशमुख यांनी ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’ अशी उत्तरे दिली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयने तात्काळ चौकशी सुरू केली होती. आज (बुधवार) गेल्या काही तासांपासून अनिल देशमुख यांच्याकडे चौकशीचे काम चालू होते. दरम्यान, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवरून सीबीआयच्या अधिकार्‍यांनी देशमुख यांच्याकडे प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करीत असल्याचं देखील देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीदरम्यान सांगितलं आहे. सीबीआयच्या जवळपास सर्वच प्रश्नांना देशमुख यांनी मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही अशी उत्तरे दिली आहेत. प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. ते प्रकरण सुरू असतानाच मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर वेगानं घडामोडी घडत गेल्या. त्यामध्ये राज्य सरकारने परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सविस्तरपणे पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे आरोप केले. एवढेच नव्हे तर परमबीर सिंग यांनी न्याय मिळवण्यासाठी तसेच केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत त्यावर सुनावणी केली आणि सीबीआयला आरोपांची चौकशी करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

सीबीआयने आज चौकशीसाठी अनिल देशमुख यांना बोलावले होते. जवळपास 6 ते 7 तास अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआयचे अधिकारी चौकशी करीत होते. त्या चौकशीत अनिल देशमुख यांनी मला माहित नाही, माझा काही संबंध नाही अशी उत्तर दिली तर काही अधिकारी महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करत असल्याचे सांगितले आहे.