अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षात 100 कोटी देणार : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रुपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12.98 कोटींचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामजिक न्यय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळणेबाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

संयुक्त समितीची स्थापना
अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकारचे लघुउद्योग सुरु करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकॉमचे प्रतिनिधी तसेच बँकर्स यांची संयुक्त समिती स्थापन केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार
संयुक्त समिती कृती आराखडा तयार करुन पुढील बैठकीस अहवाल सादर करेल. जिथे कच्चा माल उपलब्ध असेल तिथे त्याचे उत्पादन करुन मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

15 टक्के मार्जिन मनी वितरीत करणार
15 लाख ते 20 लाख रुपयापर्यंतचे लघुउद्योग सुरु करण्यासाठी 15 टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुकास्तरावर नवउद्योजकांमार्फत सेवा व उत्पादन पुरविणारी साखळी निर्माण करुन त्यातूनच हे नवउद्योजक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकित NOGA, MAIDC, BVG, A Store, लीडकॉम शॉपी, ले धारावी या लघुउद्योजक कंपन्यांनी आपले सादरीकरण केले.