अदर पूनावाला यांनी दिलं कोरोना वॅक्सीनसंदर्भात मोठं अपडेट, जाहीर केली किंमत आणि उपलब्धता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. दरम्यान, सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड कोरोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती दिली. फेब्रुवारीपर्यंत ही संख्या १०० कोटींच्या पुढे असेल. ठराविक परिस्थितींमध्ये कोविडशिल्ड लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार आहे. मात्र, मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

अधिक माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले, की भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल. सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल. सर्वसामान्यांना सहजपणे लस उपलब्ध होणार आहे. जर पात्र असतील तर त्यांनी सरकारी केंद्रावर जाऊन घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मार्चच्या आधी मार्केटमध्ये १० टक्के डोस उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लस वितरण सरकारच्या अखत्यारित राहील.