धक्कादायक ! राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 100 हून अधिक पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 2325 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हयरस संक्रमणाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अशी बनली आहे की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या 2325 पोलिसांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या तीन दिवसांच्या अहवालावर नजर टाकली तर सलग तिसऱ्या दिवशी 100 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी झपाट्याने कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 114 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची लक्षण असलेल्या पोलिसांमध्ये 10 पोलीस अधिकारी आहेत, तर 104 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या संक्रमणामुळे महाराष्ट्रात आतापर्यत 26 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या पोलिसांची संख्या 100 च्यावर गेली आहे. गुरुवारी 131, शुक्रवारी 116 आणि शनिवारी 114 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

2325 मध्ये 259 पोलीस अधिकारी

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड19 रुग्णांपैकी 259 पोलीस अधिकारी असून 2066 पोलीस कर्मचारी आहेत. या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, आतापर्यंत 970 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 114 कर्मचारी संक्रमित झाले आहे. या आठवड्यात दररोज 100 हून अधिक पोलीस कर्मचारी संक्रमित होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोविडी-19 च्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर किंवा वैद्यकीय सेवेतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्याची घटना अलीकडच्या काळात घडलेली नाही.