तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये भरती : ‘या’ भाजप नेत्याचा दावा

कोलकत्ता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय पक्षात नेत्यांचे पक्षांतर करून घेण्याची चढाओढ लागली आहे. तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. विशेष म्हणजे अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अर्जुन सिंह म्हणाले की , ‘तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. काही आमदार निवडणुकीपूर्वी आणि काही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार आहेत.’अर्जुन सिंह यांनी केलेल्या या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असं तृणमूलने म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या भाटपुरी मतदार संघातून आमदार राहिलेले अर्जुन सिंह यांचे उत्तर कोलकातापासून नादिया भागात वर्चस्व आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील ४० लोकसभा जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ठेवलेले आहे.