गजा मारणे मिरवणूक प्रकरणी आतापर्यंत 101 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या महिन्यात तळोजा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी रॅली काढली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत 101 जणांना अटक केली आहे. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या 30 पेक्षा अधिक गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गुंड गजा मारणे आणि त्याच्या 13 साथीदारांवर मोक्का अंतर्गत गु्न्हा दाखल केला होता. संतोष हिरामण गावडे उर्फ पप्पू याच्या हत्येप्रकरणी पुरेशा पुराव्यांअभावी त्या सर्वांना निर्दोष मुक्त केले होते. तसेच अमोल बधे याच्या हत्येप्रकरणी कोर्टाने मारणे आणि त्याच्या 21 साथीदारांना निर्दोष ठरवले होते. आहे. गजा मारणेच्या निर्दोष सुटकेनंतर तळोजा कारागृहापासून ते कोथरूड येथील मारणेच्या घरापर्यंत शेकडो आलिशान गाड्यांच्या ताफ्यात मिरवणूक काढली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, रायगड आणि नवी मुंबई येथील मारणेच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले होते.

कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर आतापर्यंत 101 जणांना अटक केली आहे. तसेच पुण्यातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये तसेच इतर कार्यक्षेत्रात गुन्हा नोंद झालेल्या आरोपींना अटक केल्याची माहिती अटक कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी दिली. पुणे पोलिसांनी गजा मारणेला सातारा येथे अटक केली असून महाराष्ट्र धोकादायक उपक्रम अधिनियम कायद्यांतर्गत मारणेची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. तसेच मारणेच्या टोळीतील साथीदारांविरोधात यापुढेही मोक्का चालवण्याचा विचार पोलिस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.