भारतातील सर्वात वयस्कर 103 वर्षांच्या आजोबांनी ‘कोरोना’ला हरवलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनावर मात करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता भारतातील सर्वात वयोवृद्ध कोरोना रुग्णाने कोरोनाला हरवले आहे. 103 वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. सुखा सिंह छाबरा असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना ताप आला होता आणि श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सुखा सिंह यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. मात्र 14 दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. सुखा सिंह यांच्यावर 24 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
विशेष म्हणजे सुखा सिंह शंभरी पार असूनही त्यांना ब्लड प्रेशर किंवा डायबेटिज असा कोणताही आजार नाही.

त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली, त्यातूनही ते बाहेर पडले आणि कोरोनामुळे खचलेल्या इतर कोरोनाग्रस्तांसाठी प्रेरणा ठरले आहेत. वयाने काहीही फरक पडत नाही. आजाराशी लढण्याची ताकद आणि जगण्याची जिद्द असेल तर आपण कोणत्याही आजारावर मात करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.