Coronavirus : राज्यात दिवसभरात 10 हजारांहून अधिक रुग्णांची ‘कोरोना’वर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असताना सोमवारी (दि.4) दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या एकूण 10 हजार 362 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 47 हजार 361 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज 2 हजार 765 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 47 हजार 011 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 48 हजार 801 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आज 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 49 हजार 695 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.56 इतका झाला आहे.

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव

दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या 8 प्रवाशांमध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.