युपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणार : विनोद तावडे

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

युपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
युपीएससी/एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी क्लासेसमार्फत जास्त फी घेतली जाते व या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत सदस्य हेमंत टकले, जयदेव गायकवाड यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षांचा सराव होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांची माहिती होण्यासाठी संकेतस्थळाबरोबरच वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात येईल. सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.