NIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला करण्याची बनवत होते योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने शनिवारी अलकायदाचा आतंकवादी असीम अन्सारीला पश्चिम बंगाल मधून अटक केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुर्शिदाबादच्या जलंदी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या नांदपरा कालिगंज येथील रहिवासी असीम अन्सारीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याला दिल्लीमध्ये असणाऱ्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, तिथं त्याची चौकशी केली जाईल.

एनआयएने केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातून तसेच पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मधून 19 सप्टेंबरला अलकायदाच्या 9 आतंकवाद्यांना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, असीम हा यांच्यातील 10वा आतंकवादी आहे. असे सांगितले जात आहे की अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांचा संपर्क पाकिस्तानशी आहे आणि यांची नवी दिल्लीसह अनेक सरकारी संस्थांवर हल्ला करण्याची योजना होती.

एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा , देशी बॉम्ब, जिहादी साहित्य आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. ते दिल्ली, मुंबई, कोची सह अनेक सरकारी संस्थांवर हल्ला करण्याची योजना आखत होते.

मागील आठवड्यात 9 जणांना अटक केल्यानंतर एनआयएने सांगितले की, “प्राथमिक चौकशी नुसार या आतंकवाद्यांना पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अलकायद्याच्या आतंकवाद्यांकडून सोशल मीडियायाद्वारे कट्टर बनवले गेले आणि दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांवर हल्ला करण्यासाठी प्रेरित करण्यात आले होते. त्यानुसार यांनी योजना आखायला सुरुवात केली होती आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा केला होता. स्फोटके खरेदी करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.”