10वी – 12वीच्या परीक्षेतील कॉपीचा ‘पाथर्डी पॅटर्न’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रामधून जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून भरघोस गुणांनी पास करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेले कॉपीचे रॅकेट जोमात सुरु आहे. या गैरप्रकाराकडे पुणे बोर्डासह जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बारावीच्या परीक्षेतील हा कॉपीचा ‘पाथर्डी पॅटर्न’ चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेत शेकडो ‘ड’ विद्यार्थ्यांना चांगल्या मार्काने पास करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील काही निवडक संस्थामधून शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने वर्षभरातील उपस्थिती व अभ्यासक्रमांच्या सोपस्काराला फाटा देवून ‘अर्थ’पूर्ण तडजोडीतून कागदोपत्री घोडे नाचवत सोईस्करपणे प्रवेश व परीक्षेला बसवले जात आहे. त्यामुळे मात्र तालुक्यातील स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्याचे स्वप्न धुळीस
मिळत आहे.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा ; ‘या’ 3 बड्या राष्ट्रांची मागणी 

पुणे, मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांची आयात
पुणे, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, बीड, नाशिक, रायगड या ठीकाणहून एजंटामार्फत हमखास पास होण्याचा खात्रीवर प्रती विद्यार्थ्याकडून पन्नास हजार ते एक लाख रुपये घेवून खास कॉपी पुरवण्यापासून ते राहण्या खाण्याची सोय करण्यापर्यंत यंत्रणा राबत असते. शिक्षण संस्थाचालक यांच्या घरी अश्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी खानावळी व राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाची हात मिळविणी ?
कॉपी रॅकेट उघड झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्या बाहेरील विद्यार्थ्यांना तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही, असे यापूर्वी अनेकदा सांगितले होते. परंतु आजही शेकडो जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचे बेकायदा प्रवेश झाले आहेत. यासाठी शैक्षणिक वर्ष व परीक्षा सुरु होण्याआधी कॉपी रॅकेट चालवणाऱ्या संस्था चालकांचे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत गोपनीय बैठक झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.

पाळेमुळे पुण्यापर्यंत

गेल्या तीन वर्षात शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांना तालुक्यातील ठराविक संस्थामधून प्रवेश दिल्याबाबत तसेच कॉपी प्रकरणी काय कार्यवाही केली, याबाबतच्या अहवालाची अधिकाराअंतर्गत माहिती मागवली असता त्या अर्जाला केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे कॉपीच्या पॅटर्नची पाळेमुळे पुण्यापर्यंत असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यार्थी परमिटरूमवर ?

परीक्षा देण्यासाठी जिल्हया बाहेरून आलेले ऐन पस्तीशीतील युवक-युवती रात्री परमिट रूम, पानटपऱ्या, बाजारपेठ याभागात अर्धनग्न कपडे घालून फिरताना आढळून येतात. जिल्ह्या बाहेरील विद्यार्थ्यामुळे तालुक्यातील शिक्षनाचा दर्जा खालावला असून त्यामुळे स्थानिक अभ्यासू विद्यार्थी स्पर्धेत मागे पडून मोठा अन्याय होत आहे.