दहावीच्या विद्यार्थ्याचा होस्टेलमधील मित्राकडून खून

अंबाजोगाई (बीड) : पोलीसनामा ऑनलाईन – अंबाजोगाई येथील नागझरी परिसरातील अमृतेश्वर नगरात एका खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या दोघा विद्यार्थ्यातील किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणातील दोन्ही मुले दहावीचे विद्यार्थी असून अवघे १५ वर्षे वयाचे आहेत. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीने अंबाजोगाई शहरातून पळ काढला. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दत्ता अशोक हजारे (वय १५, रा. पोळ पिंपरी, ता. परळी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बर्दापूर येथील रेणूक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. दत्ताचे वडील शेतमजूर असून त्यांना दोन मुली आणि एकुलता एक मुलगा होता. खाजगी शिकवणी आणि शालेय शिक्षणासाठी दत्ताला वडिलांनी अंबाजोगाई येथील राजमाता गुरुकुल या खाजगी वसतिगृहात राहण्यासाठी ठेवले होते. या वसतिगृहात दत्ता सोबत आणखी एक दहावीचा विद्यार्थी राहत होता. मंगळवारी सकाळी दत्ता आणि त्या विद्यार्थ्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघेही शाळेत प्रथम सत्र परीक्षा आटोपून वसतिगृहात परतले. त्यानंतर दत्ता हजारे वसतिगृहाच्या छतावर अभ्यास करत बसला होता.

दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तो विद्यार्थी दत्ता जवळ आला आणि सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात कोणती तरी जड वस्तू मारली. हा घाव वर्मी बसल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला. दत्ता निपचित पडल्याचे पाहून त्या विद्यार्थ्याने घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने वसतिगृह चालकाने छतावर येऊन पहिले असता त्याला दत्ताचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेची खबर मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. मयत दत्ता हजारे याच्या वडिलांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अंबाजोगाईकडे धाव घेतली आणि एकुलत्या एक मुलाचे कलेवर पाहून हंबरडा फोडला.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक सुरेश गायकवाड, पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते, सहा. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थ्यातील भांडणाचे नेमके कारण काय आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत असून फरार अल्पवयीन आरोपीचाही शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.