’10 वी’ची उत्तरपत्रिका सापडली झेरॉक्स सेंटरवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरु होताच अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत सोडवलेल्या उत्तर पत्रिकेची झेरॉक्स सेंटरवर विक्री सुरु झाली होती. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी न्यायालयासमोरील तसेच माणिकदौंडी रोडवरील झेरॉक्स सेंटरवर धाडी टाकून झेरॉक्स मशीनसह उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ‘कॉपी’चा ‘पाथर्डी पॅटर्न’ पुन्हा चर्चेत आला आहे.

मंगळवारी अकरा वाजता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होवून अवघ्या १५ ते २० मिनीटात चारही प्रकारच्या प्रश्नपत्रिका फुटून सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स सेंटरवर विक्री सुरु झाली होती. त्यामुळे झेरॉक्स सेंटरवर उत्तरपत्रिका खरेदी करण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. झेरॉक्स दुकानावरील गर्दी पाहून पोलिस निरिक्षक रमेश रत्नपारखी यांनी सहकाऱ्या मार्फत न्यायालयासमोरील मुकुंद सुखदेव गर्जे व माणिकदौंडी रोडवरील आकाश घोरपडे यांचे झेरॉक्स दुकान तपासले असता याठिकाणी उत्तरपत्रिकांची झेरॉक्स करण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबधित झेरॉक्स चालक व त्याठिकाणचे झेरॉक्स मशीन, व काही सोडवलेल्या इंग्रजी विषयाचे उत्तरे असलेले कागदपत्र ताब्यात घेण्यात आले. परंतु उशिरा पर्यंत शिक्षण विभागाकडून याबाबत काहीच हालचाल न झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन युवकांना नोटीस देवून सोडून दिले.

हेही वाचा – तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाला लूटले 

पेपर सुरु होताच अवघ्या अर्धा तासात श्री तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागील बाजूने तहसीलच्या आवारातून मोठ्याप्रमाणावर कॉपी पूरवणाऱ्या युवकांची धावपळ व आरडाओरड सुरु होती. अपुरा पोलीस बंदोबस्त यामुळे नायब तहसीलदार पंकज नेवसे हे हातात काठी घेवून कॉपी पूरविणाऱ्या युवकांना पिटाळुन लावण्याचा प्रयत्न करत होते.