अमेरिकेत ‘कोरोना’च्या संकटात 11 भारतीय नागरिकांचा मृत्यू, 16 जण COVID-19 पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे जवळपास 11 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आत्तापर्यंत 14 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 4 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाची लागण झालेले सर्व भारतीय पुरुष असून ज्यामध्ये 10 जण न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी भागातील आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 4 जण न्यूयॉर्क शहरात टॅक्सी चालक असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूयॉर्क शहर कोरोनाचा केंद्रबिंदू
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. या ठिकाणी 6 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 38 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. न्यू जर्सीमध्ये कोरोनामुळे 1500 जणांचा मृत्यू झाला असून 48 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, फोलोरिडामध्ये कोरोनामुळे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

या राज्यातील रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या चार महिलांसह सर्व 16 भारतीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जण न्यूयॉर्क, 3 न्यू जर्सी मध्ये असून उर्वरीत टेक्सास आणि कॅलिफोर्निया सारख्या राज्यातील आहेत. होम क्वारंटाइन करण्यात आलेले भारतीय नागरिक महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील आहेत.

कोरोनाग्रस्त भारतीय नागिरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि अमेरिकेतील वाणिज्य दूतावास यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कठोर प्रवासी निर्बंध आणि नियमांमुळे या ठिकाणी स्थानिक शहर अधिकारी मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना देखील अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.