अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 11 भारतीय विद्यार्थ्यांना अटक

वाशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकेत बेकायदा (illegally remain in us) वास्तव्य केल्या प्रकरणी 15 विद्यार्थ्याना (Student) अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) प्रशासनाने अटक (arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 11 भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना बोस्टन, वॉशिंग्टन, ह्युस्टनसह अन्य शहरांतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत लिबियाचे दोन, सेनेगल आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. ही कारवाई ऑप्टिकल इल्युजन मोहिमेचा एक भाग आहे. या अंतर्गत विदेशातून आलेल्या ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT)कार्यक्रमाचा बेकायदा वापर करुन अमेरिकेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जाते, असे आयसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओपीटीअंतर्गत विदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात अमेरिकेत एक वर्षापर्यंत काम करण्याची परवानगी मिळते. जर विद्यार्थी एसटीएम पर्यायी प्रॅक्टिकल प्रशिक्षणात सहभागी झाला तर त्याला आणखी 24 महिने देशात काम करण्याची संधी दिली जाते. या अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमध्ये काम करत असल्याचा दावा केला होता.

ट्रम्प प्रशासन अमेरिकेला अव्वलस्थानी नेत आहे. शिवाय इमिग्रेशन यंत्रणेच्या कायद्यांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खात्रीही करुन घेत आहे, याचे हे दुसरे एक उदाहरण, असे कार्यावाहक उपसचिव केन क्युसिनेली यांनी सांगितले. आयसीईचे वरिष्ठ अधिकारी टॉन फाम यांनी सांगितले की, आयसीईकडे फसवणूक कमी करण्यासाठी तपासणी करणारी यंत्रणा आहे. विद्यार्थी, अभ्यांगता आणि शाळा अमेरिकेच्या परदेशी वास्तवाच्या कायद्याचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करुन राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी आयसीई कटिबद्ध असल्याचे टॉनी यांनी सांगितले.

You might also like