स्कुटीवरून जाणार्‍या शिक्षिकेच्या अंगावर वीजवाहक तार पडली, गाडीसह महिला जळून खाक

बांसवाड : वृत्तसंस्था – स्कुटीवरुन शाळेत जाणा-या एका 25 वर्षीय शिक्षिकेच्या अंगावर 11 केव्हीची वायर पडल्याने जळून जागीच मृत्यू झाला. राजस्थानच्या बांसवाड जिल्ह्यातील नोगामा क्षेत्रात ही दुर्दैवी घटना घडली. अचानक मोठा आवाज झाला अन् तार तुटून स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडली. विजेचा वायरमध्ये हाय व्होल्टेज असल्याने महिलेच्या शरीराने पेट घेतला अन् महिला जागीच ठार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मृत शिक्षिका ही राजकीय उच्च प्राथमिक विद्यालयात, गणेशपुरा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून शाळेत जात होत्या. अचानक वातावरणात झालेल्या बदल्याने आणि वाऱ्यामुळे विजेची वायर तुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ फोन करुन वीज वितरण कार्यालयात वीज कापण्यासाठी सांगितले होते. मात्र वीज वितरण विभागाने तब्बल 20 मिनिटांनंतर वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे, स्थानिकांनी वीज वितरण कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काही महिन्यांपूर्वी याच भागात वीजेची तार तुटल्याने दोन पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेच्या वडिलांना याबाबत सांगितले. त्यानंतर, मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे वडिल रणछोड पाटीदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.