संतापजनक ! ११ महिन्याच्या चिमुकलीचा जमिनीवर आपटून खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आई-वडिलांशी वाद घालून झोळीत झोपलेल्या 11 महिन्याच्या मुलीला जमिनीवर जोरात आपटून तिचा खून करण्यात आला. श्रीरामपूर शहरालगतच्या निपाणी वडगाव शिवारात ही दुर्दैवी घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ भाऊराव कुदळे (वय 27, रा. राऊत वस्ती, अशोकनगर, निपाणी वडगाव शिवार, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याने स्वतःच्या कल्याणी या अवघ्या अकरा महिन्यांच्या मुलीचा खून केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ कुदळेची आई मनकर्णा कुदळे यांनी फिर्याद दिली आहे.

सोमनाथ कुदळे याने रविवारी आई-वडिलांसोबत कडाक्याचे भांडण केले. भांडणात त्याने झोळीत झोपलेली स्वतःची अकरा महिन्याची मुलगी जोरात जमिनीवर आपटली. यात डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी दुपारी मयत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीचा खून केल्याप्रकरणी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे करीत आहेत.