Coronavirus : राज्यात एकाच दिवसात वाढले 11 ‘कोरोना’चे रुग्ण, अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात देशात तब्बल 98 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधित रुग्णांची सख्या 298 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे.

राज्यात कोरोनाचे लक्षणे आढळून आलेल्या 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे मुंबईतील असून एक पुण्यातील आहे. त्यामुळे राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती स्टेज 2 वर असल्याचे टोपे यांनी सांगितले. मात्र, गेल्या 24 तासात वाढलेल्या 11 कोरोनाबाधित रुग्णापैकी 8 जण परदेशातून आले आहेत. त्यांची दखल घेण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तर इतर तिघांना संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाच्या स्टेज 3 ची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील सर्व खासगी कार्यालये बंद झालीच पाहिजे. दरम्यान ही कारवाई करताना आपण घाई गडबड करून चालणार नाही. या व्यतिरिक्त राज्यातील सर्व महानगर पालिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत दिली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम वापरात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान मुंबई महानगरातील लोकल ट्रेनच्या गर्दीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. मुंबई महानगरातील गर्दी अशीच राहिली तर मुंबईची लाईफ लाईन बंद करावी लागेल असे टोपे यांनी सांगितले.