‘द बर्निंग’ एमव्ही एसएसएल जहाजावरुन २२ पैकी ११ जणांना वाचवण्यात यश

कोलकाता : वृत्तसंस्था

कृष्णपटनम वरून कोलकत्याला जाणाऱ्या एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला काल(बुधवारी ) रात्री समुद्रात आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.यातील कंटेनर चा रात्री स्फोट झाल्यामुळे बघता बघता संपूर्ण जहाजाला आग लागली . या जहाजावरील आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी रवाना केले . जहाजावरील २२ क्रू मेंबर पैकी ११ क्रू मेंबर ना वाचवण्यात यश मिळाले आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचं हे जहाज आहे. या जहाजात जवळपास ४६४ कच्च्या तेलाचे कंटेनर आहेत यातल्या ६० कंटेनर ला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. समुद्रातील जोरदार वाऱ्यामुळे ही आग भडकत आहे. तर बदलत्या हवामानामुळेही बचाव अभियानात अडचणी येत आहेत. आगीत जवळपास ७०टक्के जहाज जळून खाक झाले आहे. ह्या जहाजाला शक्य तेवढी मदत पोहोचवली जात आहे. तटरक्षक दलाच्या चार मोठ्या जहाजांद्वारे बचावकार्य सुरु आहे. आग विझवण्यासाठी विशाखापट्टणममधूनही एक जहाज रवाना केले आहे.