मोदींच्या सभेचा बंदोबस्त संपवून परतणाऱ्या पुण्यातील एसआरपीएफची बस उलटली, ११ कर्मचारी जखमी

गोंदीया : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ ची बस गोंदीया-आमगाव मार्गावर बुधवारी रात्री ११:३० च्या सुमारास उलटली. या अपघातात ११ पोलीस जखमी झाले आहेत. यातील २ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोंदीयातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ चे समादेशक अशोक मोराळे यांनी दिली.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा काल गोंदीयामध्ये पार पडली. या सभेच्या बंदोबस्तासाठी पुण्यातील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ च्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. बुधवारी रात्री बंदोबस्त संपवून पथकाची बस परतत होती. त्यावेळी गोंदीया-आमगाव रस्त्यावर समोरून आलेल्या वाहनाला चुकविताना बस रात्री ११:३० च्या सुमारास उलटली. बसमध्ये २६ ते २७ कर्मचारी होते. यातील ११ जण जखमी झाले आहेत. तर ४ ते ५ जणांना गंभीर मार लागला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर गोंदीयाच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर मार लागलेल्या २ कर्मचाऱ्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. असे त्यांनी सांगितले.