सोशल मीडियामुळे मिळाला 11 वर्षीय गतीमंद मुलीच्या नातेवाईकांचा पत्ता

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियामुळे अनेक अपराध झाल्याचे आपण वाचले असेल किंवा ऐकले असेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली. मात्र, याच सोशल मीडियामुळे कुटुंबापासून दुरावलेली एक गतीमंत मुलगी पुन्हा आपल्या कुटुंबात गेली. पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करुन एका गतीमंद मुलीला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. माला सुरेश शिंदे (वय-11 रा. पाथरी, ता. बार्शी) असे या मुलीचे नाव आहे.

येरमाळा पोलिसांच्या गस्तीवरील पथकाला एक 11 वर्षीय गतीमंद मुलगी बार्शी रोडवर चालत जाताना दिसली. मुलीकडे चौकशी केली असता तिने कोणतीच माहिती दिली नाही. पोलिसांनी पारधी, कन्नड भाषी व्यक्तींना बोलावून त्यांच्यामर्फत चौकशी केली मात्र, ति काहीच उत्तर देत नसल्याने तिच्याकडे कागद दिला असता तिने केवळ ABCD आणि 123 एवढेच लिहले. त्यामुळे तिच्या नातेवाईंकांचा शोध घेणे येरमाळा पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

येरमाळा पोलिसांनी या मुलीचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करून त्या मुलीबाबत माहिती असल्यास येरमाळा पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. सदर मुलीचा फोटो सोलापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या ग्रुपवर शेअर करण्यात आला. दरम्यान, हा फोटो पांगरी पोलीस ठण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला. पांगरी पोलिसांनी येरमाळा पोलिसांकडे संपर्क साधून ही मुलगी माला शिंदे असून ती मंगळवार (दि.12) पासून बेपत्ता असून तिची बेपत्ता असल्याची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सांगितले.

पांगरी पोलिसांनी मुलीचे आजोबा माणीक शिंदे यांना घेऊन येरमाळा पोलीस ठाणे गाठले. माणिक शिंदे यांनी ही मुलगी गतीमंद असून मंगळवारी पाणी आणण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र ती परत न आल्याने बार्शी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्याचे येरमाळा पोलिसांना सांगितले. येरमाळा पोलिसांनी खात्री करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले.

Visit : Policenama.com