विजेच्या धक्क्याने ११ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, महावितरणच्या सेक्शन इंजिनियरसह लाईनमनवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेतून आल्यानंतर आजीला भेटण्यासाठी जाणाऱ्या ११ वर्षीय चिमुरडीचा विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना जनता वसाहतीच्या गल्ली क्र. २९ मध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी महावितरणच्या सेक्शन इंजिनियर आणि लाईनमन यांच्याविरोधात दत्तावाडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरी अशोक शिळीमकर (वय ११, रा. जनता वसाहत) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर याप्रकरणी तिचे वडील अशोक शिळीमकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक शिळीमकर हे हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम करतात. सोमवारी त्यांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे ते घरी होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती खेळण्यासाठी आजीच्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी थोडासा पाऊसही पडला होता. त्यामुळे काही प्रमाणात रस्त्यांवर पाणीही साचलेले होते.

दरम्यान ती आजीकडे जात असताना रस्त्यात पाणी पडलेले असल्याने तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाचा आधार घेऊन पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खांबामध्ये वीजप्रवाह वाहत होता. तिला विजेचा जोरदार धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांनी तिला लाकडाच्या साह्याने खांबापासून दूर केले. ती खाली पडली. परंतु खाली पाण्यातही वीजप्रवाह वाहत होता. त्यामुळे तिला पुन्हा पाण्यातील वीजेचा धक्का बसला.

त्यानंतर कसेबसे लोकांनी तिला बाजूला केले. तिचे वडील शिळीमकर यांनाही माहिती मिळाली. त्यांनी धाव घेत तात्काळ स्थानिकांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु तिला उपचारापुर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी शिळीमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेक्शन इंजिनियर व लाईनमन यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनता वसाहत परिसरातील खांबाची नियमित तपासणी केली नाही. निष्काळजी केल्याने गौरीला वीजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी महावितरणकडून अहवाल मागविण्याता आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. केंचे यांनी दिली.