कौतुकास्पद ! 11 वर्षाच्या भारतीय मुलीनं दुबईत केलं ‘वर्ल्ड’ रेकॉर्ड, काही मिनीटांमध्येच केले योगाचे तब्बल 100 आसनं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारताने ‘योग’ ही जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. आज अनेक देशांना योगासनांचं महत्व कळालं आहे. ज्या ‘योग’ संस्कृतीचा उगम भारतीय मातीत झाला त्यात भारतीय कसे मागे राहतील बरे! दुबईत राहणारी मूळ भारतीय वंशाची समृद्धी कालिया हिने योगासने करण्यात विश्वविक्रम केला आहे. समृद्धीने काही मिनिटांच्या आत 100 योगासने केली आहेत. समृद्धी सध्या 11 वर्षांची आहे. हा तिचा तिसरा आणि या महिन्यातील दुसरा विश्वविक्रम आहे.

समृद्धीने गुरुवारी जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीत एक लहान जागी वेगवान 100 योगासने करून विश्वविक्रम केला आहे. हा विश्वविक्रम तिने 3 मिनिटे 18 सेकंदामध्ये केला आहे.

काही दिवसांपूर्वीच समृद्धीने एका लहान बॉक्समध्ये वेगवान एका मिनिटांत 40 योगासने करण्याचा तिचा दुसरा विश्वविक्रम केला होता. 21 जून (आंतरराष्ट्रीय योग दिवस) रोजी तीने हा विश्वविक्रम केला होता. याअगोदर तिच्या या योगातील नैपुण्याला पाहून भारत सरकारने 9 जानेवारी 2020 रोजी प्रवासी भारतीय दिवस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

समृद्धीचे वडील सिद्धार्थ कालिया यांनी सांगितलं की, “ती वयाच्या सहाव्या वर्षांपासून योगासने करत आली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये समृद्धीने विजेतेपदे पटकावली आहेत.”