धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलानं यूटयूबवरून शिकली हॅकिंग, वडिलांकडेच मागितली 10 कोटींची खंडणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इयत्ता पाचवीत शिकणार्‍या 11 वर्षांच्या मुलाकडून आपण काय-काय करण्याची अशी अपेक्षा करू शकता? उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील एका 11 वर्षाच्या मुलाने असा गुन्हा केला आहे की ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या मुलाने यूट्यूब वरून हॅकिंग शिकले आणि त्यानंतर त्याच्या स्वत:च्या वडिलांना ईमेल पाठवून 10 कोटी रुपयांची मागणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून ईमेल पाठविला गेला होता तो पीडितेच्या वडिलांच्या घरी असल्याचेच आढळले. संपूर्ण प्रकरण काय आहे त्याबाबत जाणून घेऊया…

एका आठवड्यापूर्वी गाझियाबादमधील एका व्यक्तीला धमकी देणारा ईमेल आला. यामध्ये असे लिहिले होते की जर आपण 10 कोटी रुपये दिले नाहीत तर आपले अश्लील फोटो सार्वजनिक केले जातील. तुम्हाला व तुमच्या कुटूंबालाही ठार मारण्यात येईल. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की हा ईमेल एका हॅकर्स ग्रुपने पाठविला आहे. पीडित व्यक्ती गाझियाबादमधील वसुंधरा कॉलनीत राहतो. धमकीमध्ये असे स्पष्टपणे लिहिले होते की जर तुम्ही 10 कोटी रुपये दिले नाहीत तर तुमचे अश्लील फोटो आणि घरातील सदस्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर व्हायरल करण्यात येईल.

यानंतर पीडित व्यक्ती पोलिसांकडे पोहोचला. त्या व्यक्तीने सांगितले की 1 जानेवारीला त्याचा ईमेल आयडी हॅक झाला होता. हॅकर्सनी त्याच्या ईमेल आयडीचा पासवर्ड बदलला. तसेच मोबाईल क्रमांकासोबतही काही छेडछाड केली. यानंतर त्याला 10 कोटी रुपये देण्यासाठी धमकीचा ईमेल पाठविण्यात आला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित व्यक्तीने लिहिले होते की हॅकर्स त्याच्या रोजच्या जीवनावर लक्ष ठेवून आहेत. मला व माझ्या कुटुंबाला सतत त्रास देत आहेत. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

जेव्हा पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आणि ईमेल पाठविणार्‍याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. धमकी देणारा ईमेल पीडित व्यक्तीच्या घरात असलेल्या आयपी अ‍ॅड्रेसवरून पाठविला गेला होता. जेव्हा पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या 11 वर्षीय मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.

इयत्ता पाचवीत शिकणार्‍या या 11 वर्षाच्या मुलाने हा गुन्हा का केला याचा पोलिस आता तपास करीत आहेत. या मुलाला काही दिवसांपूर्वी कॉम्पुटर ऑनलाइन क्लासच्या दरम्यान सायबर क्राइमबद्दल शिकवले गेले होते. तसेच या सायबर क्राईम पासून कसे वाचावे हेदेखील सांगण्यात आले होते. यानंतर, या मुलाने यूट्यूबवर हॅकिंगशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले. ईमेल कसा तयार करावा, सायबर क्राइम कसे करावे, अशी सर्व माहिती जमविल्यानंतर मुलाने त्याच्या वडिलांचाच ईमेल आयडी हॅक केला. त्यांना वेगवेगळ्या ईमेल आयडीने धमकी देणारे ईमेल पाठवू लागला.