Coronavirus : दिलासादयक ! गेल्या 24 तासात 14219 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, 5 लाखापेक्षा अधिक रुग्ण बरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 14 हजारांच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात लाखाच्या जवळ पोहचली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून येत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात वाढत आहे. गेल्या 24 तासात 14 हजार 219 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 490 रुग्ण बरे झाले असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.47 टक्के इतके आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याच वेळी रुग्ण वाढण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 11 हजार 015 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 93 हजार 398 इतकी झाली आहे. सध्या राज्या रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.92 टक्के आहे. याच कालावधीत राज्यात 212 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यु होण्याचे प्रमाण 3.24 टक्के इतके असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यामध्ये सध्या 1 लाख 68 हजार 126 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यामध्ये 12 लाख 44 हजार 024 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 33 हजार 922 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात 36 लाख 63 हजार 488 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 लाख 93 हजार 398 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.