साताऱ्याच्या अश्विनी पाटीलसह 119 भारतीय चीनच्या वुहानवरुन परतले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसमुळे चीनमधील वुहान शहरात अडकलेले ११९ भारतीय आणि अन्य देशातील पाच नागरिक गुरुवारी पहाटे भारतीय वायु दलाच्या खास विमानाने दिल्ली विमानतळावर परतले. त्यात साताऱ्याच्या अश्विनी पाटील हिचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर या भारतीयांची तपासणी करण्यात आली.

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या चीनसाठी वैद्यकीय उपकरणे आणि मदत साहित्य घेऊन भारतीय वायुसेनेचे एक विशेष विमान बुधवारी वुहान येथे पोहचले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संकटातील चीन नागरिकांना या मदत साहित्यामुळे मदत होण्याची आशा व्यक्त केली. सातारा येथील अश्विनी पाटील ही विद्यार्थीनी वुहानमध्ये अडकली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनी तिच्यासह देशभरातील भारतीयांना परत भारतात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते.

भारतातून १५ टन वैद्यकीय मदत घेऊन भारतीय वायु दलाचे विमान बुधवारी वुहान येथे पोहचले. त्यानंतर चीन दुतावासाच्या प्रयत्नातून या भारतीयांची वैद्यकीय तपासणी सुरु झाली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन वायुसेनेच्या विमानाने भारताकडे उड्डाण केले. गुरुवारी पहाटे ते दिल्लीतील विमानतळावर उतरले. विमानातून उतरताच विमानतळावरच या सर्व भारतीयांनी एकच जल्लोष करुन आपला आनंद व्यक्त केला.

या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर गेले १ महिना हे सर्वच जण वुहानमध्ये अडकून पडले होते. भारत सरकारने आतापर्यंत ८५० भारतीयांना वुहानमधून भारतात परत आणले आहे. त्यात ४५ अन्य देशातील नागरिकांचा समावेश आहे़