11 वी प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपुर्वी तर अंतिम वर्षाचा निर्णय ‘या’ दिवशी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दहावी-बारावीचे निकाल जुलैअखेर जाहीर होणार असून, १ ते ३१ ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं पुणे विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. तसेच १ सप्टेंबर पासून प्रथम वर्षाचे अध्यापन सुरु केले जातील, असं देखील सांगण्यात आलं आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार द्वितीय, तृतीय व अन्य वर्षाचे अध्यापन १ ऑगस्टपासून सुरु होतील, यासंदर्भातले परिपत्रक पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडील उपलब्ध असलेल्या साधनांचा अंदाज घेऊन ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. त्यानुसार शिक्षक, प्राध्यपकांनी इ-कन्टेन्ट तयार करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. तसंच प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे एक हजार तासांचा अभ्यासक्रम तयार झाला असून कुडल, गुगल क्लासरूम, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून शिक्षण चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यापूर्वी, सर्व महाविद्यालयांनी त्याचा आराखडा १ ऑगस्टच्या आधी सादर करावा, असं विद्यापिठांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालये आणि तेथील प्राध्यापकांकडून अर्ज भरून घेऊन त्यांचा वर्क फ्रॉम होमची सोय करुन द्यावी, असेही विद्यापीठांनी सांगितलं आहे. तर मंगळवारी (दि. १६) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम वर्षातील परीक्षा रद्द झाल्याबाबत पुन्हा एकदा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, राज्यपालांनी त्यास आव्हान देत कुलपती म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तरतुदीनुसार आपण निर्णय घेऊ असं म्हटलं. मात्र, अद्याप पर्यंत त्यावरती निर्णय जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले असून, त्यांची आक्रमकता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री पुढील आठवड्यात अंतिम निर्णय स्पष्ट करतील, असा विश्वास आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाविद्यालयांना विद्यापीठाने दिले निर्देश

१. १ ऑगस्टपूर्वी महाविद्यालयांनी अध्यापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा.
२. विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे अध्यापन सुरु होणार.
३. द्वितीय, तृतीय वर्षाच्या अध्यापनास १ ऑगस्टपासून सुरुवात, ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल जाणार शिक्षण.
४. प्राध्यापकांनी इ-कन्टेन्ट तयार करून जूनचा उत्तरार्ध जुलैमध्ये घ्यावा.
५. विद्यार्थ्यांकडील उपलब्ध साधने महाविद्यालयांकडील तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन अध्यापनाचा आराखडा तयार करावा.