मनपा मार्केट विभागाची 12.50 लाखांची फसवणूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका असलेल्या वैभव रवींद्र खापरे (रा. विनायकनगर, नगर) याने महापालिकेची तब्बल साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खापरे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणूक व आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या ठेकेदाराला यापूर्वीच्या मार्केट विभागप्रमुखाने अभय दिल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

महापालिका हद्दीतील रस्ता बाजू शुल्क वसुलीचे निविदाधारक अक्षय संजय सुपेकर यांनी वसुलीचा ठेका संमतीने वैभव खापरे याला दिला होता. त्याने या ठेक्यापोटी दर आठवड्याला महापालिकेत हप्ता भरणे आवश्यक होते. मात्र त्याने पैसे भरण्यास टाळाटाळ केली. नियमित रक्कम भरली नाही. महापालिकेने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले. कर म्हणून भरणा करणे आवश्यक असलेली रक्कम 10 लाख 6 हजार 641 रुपये भरली नाही. तसेच दंडाची रक्कम दोन लाख 41 हजार 594 रुपये अशा एकूण 12 लाख 48 हजार 235 रुपयांचा अपहार केला. सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी महापालिकेतील मार्केट विभागातील कर्मचारी गयाजी सुंदर झिने यांच्या फिर्यादीवरून वैभव खापरे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी मार्केट विभागप्रमुख निलंबित

रस्ता बाजू शुल्क वसुलीच्या रकमेत आर्थिक अपहार करूनही ठेकेदाराविरुद्ध कुठल्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई न करता तसेच महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याचा ठपका ठेवून मार्केट विभाग प्रमुख भोसले यांना प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी निलंबित केले आहे.

‘या’ नव्या पद्धतीने हॅकरने लुबाडले बॅंकेतील 1.5 लाख रुपये