Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांचा उच्छाद, वेगवेगळ्या चोरीचे 12 गुन्हे दाखल

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीला आळा बसला असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. गाड्यांची तोडफोड, जाळपोळ, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. मंगळवारी (दि.12) शहरामध्ये वेगवेगळ्या चोरीचे 12 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये घरफोडी आणि चोरीचे चार तर वाहन चोरीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड, सांगवी, दिघी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक तर चिखली आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन वाहने चोरीला गेले आहेत. दुकानासमोर, सोसायटीच्या पार्किंमधून, घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. वाहनांना लॉक असताना देखील चोरटे लॉक तोडून दुचाकीची चोरी करीत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तर आळंदी, दिघी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोरीच्या घटना घडल्या आहे. वाकड येथे जबरी चोरीचा प्रकार घडला असून हिंजवडी येथे घरफोडी करुन घरातील मुद्देमाल चोरुन नेला आहे. चोरट्यांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी 12 गुन्ह्यांमध्ये 3 लाख 21 हजार 132 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. यामध्ये रोख रक्कम, दुचाकी, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाइल असा ऐवज चोरुन नेला आहे.