Washim News : 12 मुलींनी पुर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा, पार्थिवास दिला खांदा, केले अंत्यविधी

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकून बारा मुलींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा दिला. मुलींनी आपल्या वडिलांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात शुक्रवारी अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलींना वडिलांना खांदा देताना पाहून संपूर्ण गाव गहिवरले होते.

ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारे सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी 92 वर्षी निधन झाले. मुलगा नसल्याने कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या बारा मुलींनी भासू दिली नाही. पश्चिम विदर्भातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पास्वामी शिक्षण संस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहणारे सखाराम काळे परिसरात दानशूर म्हणून ओळखले जातात.

12 मुलींकडून पित्याला मुखाग्नी
शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. काळे यांना 12 मुली असून मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. पुरुषांचे जे काम असते ते या बारा लाडक्या मुलींनी निभावत आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.