दक्षिण कॅलिफोनियातील डान्स बारमधील गोळीबारात १३ जण ठार

कॅलिफोनिया : वृत्तसंस्था  – कॅलिफोनियातील थाऊसन्ड ओक्स येथील डान्स बारमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणारा संशयितही ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दक्षिण कॅलिफोनियामधील थाऊसन्ड ओक्स शहरातील  बॉर्डरलाईन बार आणि गिल या डान्स बारमध्ये बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. (भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता)  या डान्स बारमधील लोकांनी सांगितले की, संपूर्ण काळा पोशाख करुन आलेल्या एका उंच माणसाने दरवाजावर काम करणाऱ्या माणसावर प्रथम गोळीबार करुन ठार केले. त्यानंतर त्याने बारमध्ये प्रवेश केला. सर्वांना घेरुन गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक जण कोपऱ्यात पळून गेले. काहींनी खिडकीतून उड्या मारुन पळून जाऊन आपली सुटका करुन घेतली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण बारला घेरले. त्यावेळी गोळीबार करणारा आतमध्येच होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा गनमॅन ठार झाला. व्हेंटुरा काऊंटी शेरिफ एरिक बुशोव यांनी सांगितले की, संशयित गनमॅनदेखील पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. पोलिसांकडून आणखी माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.