भद्रावतीत दारु तस्कराकडून १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करुन अडविलेल्या वाहनातून ५ लाखाच्या देशी दारुसह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई भद्रावती पोलिसांनी दि.२१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता केली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर – चंद्रपूर महामार्गावर एक सिल्व्हर कलरची टाटा सुमो क्र.एम.एच. ३१, सी. एन. १९२५ ही अवैधरित्या दारु घेऊन चंद्रपूरकडे जात आहे. अशी गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथील पेट्रोल पंप चौकात नाकाबंदी केली. सदर वर्णनाची टाटा सुमो चौकात येताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन दूरवर थांबवून पळ काढला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मधल्या सीटवर आणि डिक्कीमध्ये खर्ड्याच्या ५० बाॅक्समध्ये ९० मि.लि. मापाच्या ५ लाख रुपये किंमतीच्या ५ हजार सीलबंद निपा आढळून आल्या. या सर्व राॅकेट संत्रा देशी दारुच्या निपा आणि ७ लाख रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो विक्टा इक्स असा एकूण १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील सिंग पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पोलिस शिपाई केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे आणि शशांक बदामवार यांनी केली.