मुंबई HC ची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा, म्हणाले – ‘विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा निर्णय कधी घेणार?’

पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करून तब्बल 7 महिनांचा कालावधी उलटूनही यावर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या वादावर मुंबई हायकोर्टाने रोखठोक भूमिका घेतली आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या 12 सदस्यांच्या नावांवर निर्णय केंव्हा घेणार ?, असा सवाल हायकोर्टाने राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. त्यामुळे या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गेल्या वर्षी नोव्हेेंबर महिन्यात केली आहे. सदस्यांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरुन महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांनीही विधानसभेत टीका केली होती. विधानपरिषदेच्या या रिक्त जागांसाठी नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. पण ही नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असेही घटनेत म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदार नियुक्त करण्याची प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. पण अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडे असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापूर्वी राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीच्या दिरंगाईवरुन नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांचा हा अधिकार आहे. या जागा किती काळ रिकाम्या ठेवाव्यात, यालाही एक कालावधी असावा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले होते. उद्धव ठाकरेंनी याबाबत घटनादुरुस्तीचीही अपेक्षा व्यक्त केली होती. आता घटनेमध्ये दुरूस्ती केली पाहिजे. राज्यपालांना त्यांचा अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का? हे पण पाहिले पाहिजे, असेही ठाकरे यांनी म्हटले होते.